मुंबई प्रतिनिधी । माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील, असं म्हणणार्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेने जोरदार टोला लगावत तुमच्या छातीत राम असतील तर छाती फाडण्याची गरज नाही असे खोचकपणे सांगितले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातील अग्रलेखातून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व हजारो शिवसैनिकांसह रामलल्लांचे दर्शन घेतले. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळया असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे, सगळयांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले. तोच राजधर्म महाराष्ट्रात चालवला जात आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत.
यात पुढे म्हटले आहे की, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. ते म्हणाले, माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील. चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. या विषात राम कसा नांदेल? हा साधा प्रश्न आहे. चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत! अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळयांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे ङ्गरामायणफ समजले असे होत नाही. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ङ्गठाकरे सरकारफच्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल असे यात नमूद करण्यात आले आहे.