चांगुलपणाचा शोध बापू गुरूजींच्या रूपाने पूर्ण : डॉ. प्रतिमा इंगोले

भुसावळ, प्रतिनिधी । सध्या भौतिक सुखसोयींनी कळस गाठला आहे. माणूसपणाचा अभाव आढळत आहे. अशावेळी मानवतेचे प्रतिक वडाचे झाड, पर्यावरणाचे प्रतिक वाननदी व संस्कृतीचे प्रतिक असलेली गढी यांच्या माध्यमातून माझ्या आईचे वडील तथा माझे आजोबा म्हणजेच बापू गुरूजी हे ध्येयवादी व्यक्तिमत्व साकारले. . निष्ठावादी असणाऱ्या बापू गुरूजींच्या रूपाने माझा चांगुलपणाचा शोध पूर्ण झाला, असे प्रतिपादन बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील “गढी” या कथेच्या लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केले.

बारावी युवकभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत लेखिका डॉ. इंगोले बोलत होत्या. प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांनी उपक्रमाची भूमिका विशद केली. डॉ. गिरीश पवार नंदूरबार यांनी डॉ. इंगोले यांचा परिचय करून दिला. माय मराठी महाराष्ट्र संघाचे हनुमंत कुबडे पुणे व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील डिस्ले बारामती यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले म्हणाल्या की, जातिवंत साहित्य त्या त्या काळाची मागणी असते. बारावी पाठ्यपुस्तकात घेण्यात आलेली गढी ही कथासुद्धा काळाची मागणी असावी. या कथेच्या रूपाने माझा चांगुलपणाचा शोध पूर्ण झाला आहे. बापू गुरूजी हे सत्कार्याचे, सद्धर्माचे व सद्वृत्तीचे प्रतिक आहे. संस्कृती टिकवण्यासाठी बापू गुरूजींची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अकसिदीचे दाने या कथासंग्रहातून घेतलेल्या गढी कथेत वाननदी, वडाचे झाड, गढी इत्यादी प्रतिमा-प्रतीके अभ्यासपूर्णरित्या अनुभवसमृद्ध अशी साकारली आहेत. या कथेत बापू गुरूजींचा एकाकी संवाद असला तरी ही कथा म्हणजे एकपात्री संवाद नाही. ती संपूर्ण समाजाच्या उद्धाराची तळमळ आहे. अख्खा समाज या कथेचा नायक असल्याचेही डॉ. इंगोले यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी मानले

Protected Content