धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बुधवारी २४ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्या जिल्हा मोहिम पथकाने संशयास्पद रासायनिक खताचा ट्रक पकडल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, खताचा नमूना नाशिक येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर रासायनिक खत वैध आहे की अवैध हे स्पष्ट होणार आहे.
अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बुधवारी २४ मे रोजी सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची गोपनीय माहिती मंडळाधिकारी किरण देसले यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातील मोहिम अधिकारी विजय पवार, तालुका कृषि अधिकारी प्रदीप चव्हाण, मंडळाधिकारी किरणे देसले यांनी धडक कारवाई करत खतांचा ट्रक पकडला. खताने भरलेला ट्रक धरणगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला. दरम्यान, या ट्रकमधून इतर छोटा हत्ती वाहनात खतांच्या गोण्या उतरवत असतांना ग्रामस्थांनी खतांची माहिती विचारली असता छोटा हत्ती वाहनचालकाला काहीही सांगता येत नाही. त्यामुळे हा गोंधळ उडाला होता. या ट्रकमध्ये एकुण ४०० रासायनिक खते असलेले गोण्या आढळून आले आहे. ट्रक मालकाने खरेदी आणि विक्री संदर्भात पावत्या जरी प्रशासनाला दिल्या असल्या तरी खतांचा नमूना नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. याचा अहवाल किमान सात ते आठ दिवसांनी मिळणार आहे. तोपर्यंत खतांनी भरलेला ट्रक शासन जमा राहणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातील मोहिम अधिकारी विजय पवार यांनी दिली आहे.