मुंबई । गिरणी कामगारांनी आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबईवरचा हक्क सोडू नका असे भावनिक आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ते गिरणी कामगारांसाठी असणार्या सदनिकांच्या सोडतीनंतर बोलत होते.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर , म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर ,सभापती म्हाडा विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा व शिवसेना उपनेते सचिन अहिर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे असे सांगितले. घर लागल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा. आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे, असे यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.