जळगाव प्रतिनिधी । मध्यरात्री चोरी करतांना घराच्या पलंगाखाली गुटखा खावून थुंकलेल्या चोरट्याचे नमूने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले होते. संबंधित चोरट्यांच्या थुंकीशी जूळून आल्याचा अहवाल एमआयडीसी पोलीसांना मिळाला.
हकीकत अशी की, १८ जुलै २०१९ रोजी मध्यरात्री अयोध्यानगरातील प्रकाश नामदेव मेढे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी चोरी केली होती. घरातून १ लाख ५९ हजार ७५ रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेंद्र उर्फ सोफराज्या दत्तात्रय गुरव (वय ३०, रा. वाघनगर, साई संसार कॉलनी, हल्ली मु. इंदूर) व अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील (वय २४, रा. नांद्रा, ता. जळगाव) या दोघांना ९ सप्टेंबर २०१९ रोजी अटक केली होती. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघे जण सध्या कारागृहात आहेत. या दोघांनी चोरी करतेवेळी मेढे यांच्या घरात एका चादरीवर गुटखा खाऊन थंुकलेले होते. पोलिसांनी तपास करण्यासाठी ही चादर ताब्यात घेऊन या थंुकीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते. संशयित सोफराज्या व शाहरुख यांना ताब्यात घेतल्यानंतर या दोघांच्या थंुकीचे नमुनेही घेतले होते. हे दोन्ही नमुने जुळून आल्याचा अहवाल नुकताच प्रयोगशाळेने पाठवला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात असे ठोस पुरावे गोळा करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी खून, प्राणघातक हल्ला, बलात्कार या गंभीर गुन्ह्यात अशाप्रकारे प्रयाेगशाळांच्या मदतीने पुरावे गोळा केले जात होते.