राज्यात २ हजार २८७ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; एकुण आकडा ७२ हजार ३०० वर

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाच्या नवीन २ हजार २८७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता ७२ हजार ३०० वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध आहेत. सध्या ३५ हजार ९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १०३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. परिमंडळ निहाय या मृत्यूंमध्ये ठाणे -७४, (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर -१०, नाशिक -२, नाशिक १, अहमदनगर १), पुणे -२१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर -३ (सांगली ३), अकोला-३ (अकोला ३) यांचा समावेश आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत, तर ३९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ४६५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील २ दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड-३, सांगली -३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि अहमदनगर -१ असे आहेत.

Protected Content