जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । शहरातील सुप्रिम कॉलनीतील जकारीया नगरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन संशयीतांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान दोघांकडून सोमवार २४ एप्रिल रोजी तपासात पोलिसांनी ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मोहम्मद अवेस अब्दुल सत्तार (वय-२३) रा. जकारीया नगर, सुप्रिम कॉलनी यांच्या घरी चोरी झाली होती. याप्रकरणी २१ एप्रिल रोज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याची गोपनीय माहिती एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मोहसीन खान नूर खान रा. गेंदालाल मिल, व इस्माईल उर्फ राजू शेख शब्बीर रा.मास्टर कॉलनी या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून पोलीस कोठडीत ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे स्वाती निकम यांनी काम पाहिले.