जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराजवळील खेडी शिवारातील माऊली नगरात घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा ६१ हजारांची मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्याला गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुनील अमरसिंग बारेला रा. गोऱ्यापाडा ता. चोपडा जि. जळगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जळगाव शहरातील खेडी शिवारात असलेल्या माऊली नगरात शिरीष चंद्रकांत चौधरी हे वास्तव्याला आहे. २५ जून २०२५ रोजी त्यांच्या घरातून दोन मोबाईल, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा चोपडा तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी सुनील अमरसिंग बारेला याला गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापुर्वी त्यांच्या दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. श्री. जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम काम पाहिले.