गोराडखेडा शाळेत चोरी; ३० हजार रुपये किंमतीच्या सामानांची चोरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील जळगाव ते पाचोरा राज्य महामार्गालगत असलेल्या गोराडखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी दगडाने तीन शाळा खोल्यांचे दरवाजे तोडून तीन एल. ई. डी. टी. व्ही. संचची चोरी केली. त्यापैकी एक टी. व्ही. संच शाळेच्या आवारातच सोडून दोन संच घेऊन पसार झाल्याची घटना घडल्याने शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

 

रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. मात्र डॉग स्कॉडने शाळेचा परीसर व जवळ असलेल्या जिनिंग फॅक्टरी पर्यंत मागोवा घेतला व तेथून माघारी फिरले. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोराडखेडा येथील जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा असून शनिवारी सकाळी अकरा वाजता शिक्षक शाळेला कुलूप लावून घरी आले होते. रविवारी व सोमवारी होळी सणा निमित्त शाळेला सुट्टी होती. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे १  ते १.३० वाजता शाळेच्या मागील बाजूने प्रवेश केला व शाळेच्या कुलूप असलेल्या तीन खोल्यांचे कडी व दरवाजा दगडाच्या सहाय्याने तोडले.   व रुम मधील सॅमसंग कंपनीचे मुलांना शिक्षण घेता येणारे एल. ई. डी.  टी. व्ही. संच चोरुन त्यातील एक संच शाळेच्या आवारातच सोडून ३० हजार रुपये किंमतीचे दोन टी. व्ही. संच घेऊन पसार झाले. व शाळेच्या कार्यालयातील रेकार्ड, साहित्य अस्तव्यस्त करुन पसार झाले.

 

गावातील काही शेतकरी मध्यरात्री पिकांना पाणी देण्यासाठी रस्त्यावरुन जात असतांना त्यांना शाळेत ठोकठाक करण्याचा आवाज आल्याने त्यांनी मुख्याध्यापक गुणवंत पवार यांना भ्रमणध्वनीवर कळविले असता मुख्याध्यापक गुणवंत पवार, उपनिरीक्षक प्रदिप पाटील, दिपक धनगर यांनी पहाटे ६ वाजता शाळेत जावून पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी गटशिक्षणाधिकारी गिरीष जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट दिली. गुणवंत पवार यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे हे करीत आहेत.

Protected Content