गोपीनाथ मुंडे हयात असते तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसता — फडणवीस

 

 

 

मुंबई: वृत्तसंस्था ।   आज गोपीनाथ मुंडे असते, तर महाविकास आघाडी सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

 

गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर एका ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याची टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.  जननायक गोपीनाथ मुंडे आज असते तर या महाविकास आघाडी सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिम्मत कधीही झाली नसती, असे फडणवीस पुढे म्हणाले.

 

गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात तर उत्तम कामगिरी केलीच, पण पुढे जात त्यांनी केंद्रातील राजकारणातही आपली चमक दाखवली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पण पुढे युतीची सत्ता आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री बनले. त्यावेळी त्यांनी खूप चांगले काम केले, असे फडणवीस म्हणाले.

 

गोपीनाथ मुंडे हे शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेतही त्यांनी चांगले काम केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विधानसभेतील सर्व सदस्य उत्सुक असायचे, असे फडणवीस पुढे म्हणाले.

 

 

गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेल्या मार्गानेच जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात, मात्र त्यांचे कार्य असामान्य असते. गोपीनाथ मुंडे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. ते जननायक आणि लोकनायक बनले. एका छोट्याशा गावातून पुढे येत त्यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला अशा शब्दांत फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.

 

Protected Content