जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोद्री येथे हिंदू गोर बंजारा, लबाना व नायकडा समाज कुंभ होत असल्याने आम्ही व सर्व ग्रामस्थ भाग्यवान आहोत, असे प्रतिपादन सरपंच मंगलाबाई भगवान पाटील यांनी केले.
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे २५ ते ३० जानेवारीदरम्यान हिंदू गोर बंजारा, लबाना व नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने स्थानिक ग्रामस्थ अतिशय उत्साहात कामाला लागले असून गोद्री सारख्या छोट्याश्या गावात ऐतिहासिक भव्य दिव्य कुंभ होत असल्यामुळे एक चैतन्य सर्वत्र दिसून येत आहे. सरपंच मंगलाबाई म्हणाल्या की, या कुंभ मेळाव्यामुळे गोद्री गावात पाण्याची समस्या, वीज, शौचालय, रस्ते व आरोग्य केंद्र अश्या विविध समस्या सुटल्या. खरं तर यामुळे गोद्री गावाचा भरपूर विकास होत आहे. हिंदू समाजातील प्रमुख संतांचा पदस्पर्श आमच्या गावाला होणार आहे, त्यामुळे अविस्मरणीय असा हा सोहळा असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या कुंभाला सर्व समाज बांधवानी आवर्जून यावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशभरातील साधू संत महंत गोद्री गावात येणार आहे, त्यामुळे भविष्यात देखील हा कुंभ आमच्यासाठी प्रेरणा ठरेल. आमच्या भावी पिढ्यांसाठी याचा लाभ होईल. एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम आमच्या गावात होईल असा कधीच आम्ही विचार केला नव्हता. ही संत धोंडीराम बाबाजी आणि संत सेवालाल महाराजांची कृपा आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.