जळगाव – फ्लाँरेन्स नाईटिंगल यांच्या जन्मदिवसानिमित्त शुक्रवार दि.१२ मे रोजी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे परिचारिका दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थीतीत लॅम्प लायटिंगसह, नाटिका, कविता सादर करुन नर्सिंग क्षेत्राचे महत्व अधोरेखित केले. यावेळी परिसरात आकर्षक रांगोळ्या तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे किवा तेवन येथे आज सायंकाळी नर्सिंग डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य व शैक्षणिक परिषद सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक च्या प्राचार्या डॉ.ज्योती ठाकूर या उपस्थीत होत्या. यांच्यासह व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशन सचिव डॉ वर्षा पाटील, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, उपप्राचार्या विशाखा वाघ, वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडित, संकेत पाटील, शिवानंद बिरादर, प्रविण कोल्हे हे उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी नृत्याद्वारे प्रार्थना सादर झाली. त्यानंतर नर्सेस डे बद्दल नाटिका, कविता सादर झाल्यात. याप्रसंगी विद्यार्थीनी कल्याणी मुन हिने फ्लॉरेन्स नाईटिंगल यांची हुबेहुब वेशभुषा साकारली होती. अनेकांना यावेळी सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
मान्यवरांनी जागतिक परिचारीका दिनाचे महत्व आपल्या भाषणांद्वारे सांगून परिचारिका हे आरोग्य सेवेचे हृदय असल्याचेही सांगितले. तसेच परिचारीका हा आरोग्य सेवेचा भक्कम कणा आहे. कोविड काळातील त्यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. आपण करिअरसाठी नर्सिंग हे एक उत्तम क्षेत्र निवडले असल्याचेही मान्यवरांनी सांगितले. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघत होता त्याचवेळी सर्व विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकर्षक अशा स्काय फ्लाईंग कॅण्डल्सचाही मनसोक्त आनंद लुटला. यावेळी संपूर्ण परिसर कंदिलाच्या प्रकाशाने झळाळून निघाला. यानंतर डीजेचा ताल धरत विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी नृत्य करुन आनंद व्यक्त केला.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या संघर्ष बॅचतर्फे प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.प्रिया जाधव, प्रा.सुमैय्या शेख, प्रा.स्वाती गाडेगोने यांच्यासह टिमने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सूत्रसंचालन चिन्मया आणि जॉयने केले. या कार्यक्रमास गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व शिक्षकवृंद उपस्थीत होते.