मुंबई वृत्तसंस्था । राज्यभरातील पोलीस कर्मचारी कोराना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चौकाचौकात खडेपहारा दिसून येत आहे. गेल्या २४ तासात तब्बल 38 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल ४९५ वर पोहोचली आहे. यात ५० अधिकारी तर ४४५ पोलीस कर्मचारी आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने चार पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
९५ हजार गुन्हे दाखल
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यभरात ९५ हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १८ हजार नागरिकांना अटक झाली आहे. याशिवाय ५३ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून तीन कोटी ५१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.