गृहमंत्री देशमुख राज्यपालांना भेटले

 

मुंबई: वृत्तसंस्था । अर्णब गोस्वामीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज गृहमंत्री देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली.

सोमवारच्या अनेक घडामोडींनंतर लगेचच आज अनिल देशमुख राज्यपालांच्या भेटीला गेल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. प्रत्यक्षात ही भेट राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती. त्यामागे अन्य कोणतेही कारण नव्हते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या भेटीनंतर चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे.

राज्यपाल आणि सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक कारणांवरून वारंवार खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘लेटरवॉर’ झाले. त्यानंतर राज्यपाल नियुक्त सदस्यांचा तीढा अजून कायमच आहे. त्यात अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेच्या कारवाईत राज्यपालांनी एंट्री घेतल्याने सरकार व राज्यपाल यांच्यात वादाचा नवा अंक सुरू झाला आहे.

सोमवारी राज्यपालांनी गृहमंत्री देशमुख यांना फोन केल्यानंतर त्यावर सत्ताधारी पक्षांतून आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यपालांनी अर्णब यांची सुरक्षा व आरोग्याबाबत गृहमंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली होती. त्यावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला. राज्यपालांनी एका आरोपीला सहाभुभूती दाखवण्यापेक्षा पीडित कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवली असती तर ते योग्य ठरले असते, असे अल्पसंख्याक कार्यमंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. दुसरीकडे खुद्द देशमुख यांनीही राज्यपालांच्या सूचनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्य याबाबत योग्यती काळजी घेण्यात येत आहे, असे देशमुख यांनी आश्वस्त केले. कोरोनामुळे कारागृहात कोणत्याच आरोपीला वा कैद्याला भेटण्यास नातेवाईकांना मनाई करण्यात आलेली आहे. तरीही अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलायचे असल्यास ते कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन बोलू शकतात. वकिलांशीही फोनवर बोलू शकतात, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Protected Content