जळगाव, प्रतिनिधी । येथील शनिपेठ काट्या फाईल मधील एका रहिवाश्याचा आरसी नंबर अचानक मशिनमधून गायब झाल्याने त्यास रेशन मिळत नसल्याने त्याने सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्याशी संपर्कसाधून व्यथा मांडली असता गुप्ता यांनी पाठपुरावा करून त्यास पुन्हा रेशन मिळवून दिले आहे.
शनिपेठ काट्या फाईल येथे राहणारे शेख शकील यांना त्यांचे रेशन नियमित मिळत होते. परंतु, अचानक त्यांचा आरसी नंबर मशिनमधून गायब झाला. यामुळे त्यांना धान्य मिळणे बंद झाले. याबाबत त्यांनी दुकानदाराला धान्य मिळण्यासाठी काय करावे लागेल अशी विचारणा केली असता दुकानदाराने त्यांना तहसील कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. शकील यांनी दुकान ते तहसील कार्यालय अशा चकरा मारल्या. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. यात घरात धान्य नसतांना लॉक डाऊन सुरु झाल्याने हाताला काम नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली. याबाबत गुप्ता यांनी पुढाकार घेऊन तक्रारदाराची तहसीलदारांसोबत भेट घडून आणत खरी परिस्थिती मांडली. तसेच पुरवठा विभागाचे श्री. जाधव व श्री. तडवी यांच्याही ही बाब लक्षात आणून देऊन रेशनवरील धान्य पुन्हा सुरु करून दिले. यामुळे शेख यांनी दिपककुमार गुप्ता, शिवराम पाटील यांच्या टीमचे आभार मानले आहेत.