शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिष्ठातांंच्या हस्ते सन्मान

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येशील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आधुनिक औषधनिर्माणशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच लागला आहे. अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

होमियोपॅथीच्या डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करता यावी यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तर्फे हा अभ्यासक्रम राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकविला जातो. महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक होमियोपॅथीच्या डॉक्टरांना याबाबत वर्षभर सविस्तर प्रशिक्षण देतात. यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे यंदा दुसरी बॅच प्रवेशित होती. या २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा नुकताच विद्यापीठातर्फे निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्व ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये महाविद्यालयामधून कविता बांगड या प्रथम तर द्वितीय शैलेश खरे, तृतीय निलेश झंवर यांनी विशेष प्राविण्य मिळवले. विद्यार्थ्यांना औषधशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र असे ६ विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख डॉ. भाऊराव नाखले, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संजय बनसोडे, डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या विभागाने प्रशिक्षण दिले.

Protected Content