निवडणुकीच्या राष्ट्रीय उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे – पार्थसारथी मिश्रा

Electiion Raly in jalgaon

जळगाव, प्रतिनिधी । आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने निवडणुकीचा हक्क बजावला पाहिजे. निवडणुकीच्या या राष्ट्रीय उत्सवात सर्वांनी उत्सफुर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे. असे प्रतिपादन निवडणुक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांनी दिव्यांग मतदान रॅलीत आज केले.

स्वीप कार्यक्रमांतर्गत आज शहरात आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा पार्थ सारथी मिश्रा यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. श्री मिश्रा म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडणार हा विचार न करता, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. मतदानाची टक्केवारी वाढीबरोबर मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजवावा. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प तयार केले आहे, व्हीलचेअर उपलब्ध करणे, मतदान केंद्रावर जाण्यासाठी मागणीनुसार वाहन व्यवस्था, मतदान करण्यासाठी मदतनीसची उपलब्धता, दिव्यांगाचा आत्मविश्वास वाढविणेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रत्येकाने स्वत: मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा, असा संदेश श्री. मिश्रा यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी उपजिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त अरविंद मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एच. चव्हाण, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, दीपस्तंभचे संचालक यर्जेुवेद महाजन, जिल्हा आयकॉन तथा मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांचेसह मान्यवर उपस्थित होते. या रॅलीत उत्कर्ष मतिमंद विद्यालय, अंध औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दीपस्तंभ व मनोबल संस्था तसेच मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Protected Content