जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांच्या बाबत आक्षेपार्ह शब्दांमध्ये पोस्ट केल्या प्रकरणी दोघांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पोलीस अधिक्षकांना भेटून केली आहे.
भाजपचे जामनेरचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी अभिजित भामरे व इंजि. हितेन सरोदे नामक या दोघा व्यक्तीनी गिरीष महाजन ऑफीशियल पेज यावर माजी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या विषयी अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट टाकुन बदनामी केली असल्याची माहिती दिली. यामुळे या दोन्ही व्यक्तींविरूध्द आय.टी. अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केली. याबाबतचे तक्रारी निवेदन त्यांनी डॉ. पंजाबराव उगले यांना सादर केले आहे.