गिधाडांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा

मुंबई : वृत्तसंस्था । गिधाडांच्या अस्तित्वावरील संकटामुळे केंद्र सरकारने संवर्धनासाठी कृती आराखडा जाहीर केला आहे. गुजरात वन विभागाने गिधांडाच्या प्रवासाचा, उड्डाणाच्या उंचीचा, विश्रांतीचा मार्ग आणि त्यांच्या विणीच्या जागा कळाव्यात यासाठी सहा गिधाडांना टॅगिंग केले होते

१२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. टॅग केलेल्या गिधाडांमध्ये दोन पांढऱ्या पाठीची, तीन लांब चोचीची तर एक राज गिधाड या प्रवर्गातील गिधाडे आहेत. भारतामध्ये गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. आठ प्रजाती गुजरातमध्ये आहेत. चार स्थानिक तर चार स्थलांतर करून येणाऱ्या प्रजाती आहेत.

सन १९९२ ते सन २००७ या कालावधीमध्ये पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या संख्येमध्ये ९९.९ टक्के इतकी घट आढळून आली. डायक्लोफिनॅकचा हा दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर गिधाडांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले. सन २०१९मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार गुजरातमध्ये पांढऱ्या पाठीची ३५२ तर लांब चोचीची २८५ गिधाडे आढळली. यातील ४५ टक्के पांढऱ्या पाठीची गिधाडे सौराष्ट्रमध्ये होती. भावनगरच्या महुवा येथे २०१२पासून गिधाडांच्या संख्येत घट झाली नसल्याचेही आढ‌ळले. तसेच जुनागढ जिल्ह्यामध्ये सध्या ५२ टक्के लांब चोचीची गिधाडे आहेत.

गिधाडांचे संवर्धन होण्यासाठी त्यांचे भक्ष्य मिळवण्याचे क्षेत्र, त्यांच्या विणीच्या जागा, प्रवासाचा मार्ग यासंबंधी सखोल माहिती असणे आवश्यक असल्याने गिधाडांना उपग्रह टॅगिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे गीर वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गीर आणि महुवा क्षेत्रामध्ये १२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये सासण-गीर वनविभागाने तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रकल्प हाती घेतला.

या माध्यमातून गिधाडे स्थानिक स्थलांतरण, घरट्याची जागा, हद्द यासंदर्भात अधिक खात्रीशीर वैज्ञानिक माहिती हाती येईल आणि त्यानुसार संवर्धनाचे कार्य पुढे नेता येईल

मागील महिन्यामध्ये हरियाणातील पिंजोर येथील कृत्रिम प्रजनन केंद्रात जन्मलेल्या गिधाडांना टॅग करून मुक्त वातावरणात सोडण्यात आले. वनविभागाच्या सहकार्याने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हा प्रयोग केला आहे. त्यांच्याही प्रवासाची माहिती गोळा करण्यात येत आहे, असे संस्थेचे सहसंचालक आणि पश्चिम बंगाल आणि आसाम येथील गिधाड संवर्धन केंद्राचे व्यवस्थापक-तज्ज्ञ सचिन रानडे यांनी सांगितले

Protected Content