गांजा तस्करी प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील ढेकूसीम गावानजीक तीन गांजा तस्करांना तब्बल ११.२५ लाख रूपयांच्या गांजासह अटक करण्यात आली असून तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, मध्यप्रदेशातून धरणगावकडे गांजा नेला जात असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी हवालदार रवींद्र पाटील, दीपक विसावे, किशोर पाटील, अरुण बागुल, दीपक माळी, शरद पाटील, हितेष चिंचोरे, भूषण बाविस्कर, आशिष गायकवाड, सुनील पाटील यांचे पथक तयार केले.

या पथकाने ढेकूसीम गावाजवळ राजू भावलाल पवार (वय ३७, रा.केवडीपुरा ता.एरंडोल), मनोज मदन पवार (वय २७ वर्षे, रा.टाकळी, ता.धरणगाव) आणि दिनेश मेवालाल बेलदार (वय ३०, रा.मुसळी, ता.धरणगाव) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे सव्वा अकरा लाख रूपयांच्या गांजासह एमएच.१९-डीसी.२४७५ व एमएच.१९-डीजे.८७३० या दोन दुचाकी मिळून एकुण १३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिघांना शुक्रवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content