गळ्यातील सोन्याची पोत जबरी लांबविली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा उद्योग केंद्राच्या पाठीमागील परिसरात पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची पोत अज्ञात दोन भामट्यांनी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ११ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. यापुर्वी रामानंदनगर नगर परिसरातून एका महिलेची सोनसाखळी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली होती.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना सुभाष पवार (वय-५६) रा. प्रोफेसर कॉलनी, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० मार्च रोजी रात्री ९ वाजता त्या एकट्याच शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी दोन अज्ञात भामटे दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्याचे समजल्यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Protected Content