पुणे : वृत्तसंस्था । यावर्षीही गणेशोत्सव उत्सव निर्बंधातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना तसे संकेत दिले आहेत.
गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव निर्बंधातच साजरा करावा लागेल असे संकेत दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूरचा दाखला देत पवार म्हणाले जिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथं पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्या आसपास आहे. अन्य ठिकाणी जिथं गर्दी नव्हती तिथं हा दर एक टक्क्याच्या आत आहे. त्यामुळे उत्साहाला आवर घालण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.
रविवारीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली.