पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. गणेशभक्तांनी शांता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक ही पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या बैठकीत किसनराव नजनपाटील यांनी उपस्थित गणेश मित्र मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना शांतता, कायदा व सुव्यवस्थेबाबत महत्वाच्या सुचना दिल्या.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वत्र संरक्षणाच्या दृष्टीकोनातून उत्सव व समारंभास काटेकोरपणे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने सर्व निर्बंध शिथिल करत राज्यात सण उत्सव हे काही तांत्रिक बाबी वगळता साजरे करण्यास परवानगी दिल्याने येत्या ३१ आॅगस्ट रोजी श्री. गणरायाचे आगमन होत असुन गणेश भक्तांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी म्हणून पोलिस प्रशासन ही सज्ज झाले असून त्याच अनुषंगाने २७ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील १४ गणेश मित्र मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे, राहुल मोरे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, नितीन सुर्यवंशी, पोलिस काॅन्स्टेबल वसंतराव पाटील उपस्थित होते. यावर्षी शहरातीलनवक्रांती युवक गणेश मडळ, आठवडे बाजार, सोनारगल्ली गणेश मंडळ, सोनारगल्ली रंगार गल्ली विठ्ठल मंदिरासमोर, गांधी चौक गणेश मित्र मंडळ सराफ बाजार, पांचाळेश्वर गणेश मंडळ कोंडवाडा गल्ली, जयहिंद लेझीम मित्रमंडळ (कृष्णापुरी), श्रीराम चौक गणेश मंडळ (श्रीराम नगर), राजे शिवाजी नगर गणेश मंडळ (शिवाजी नगर), जयमल्हार मित्र मंडळ (देशमुखवाडी) बाळटिळक गणेश मंडळ (देशमुखवाडी), अष्टविनायक मंडळ (व्हि. पी. रोड), श्री बालाजी मित्र मंडळ (रथ गल्ली), त्रिमुर्ती मित्र मंडळ (लालबागचा राजा) अशा सुमारे १४ गणेश मित्र मंडळांनी आॅनलाईन पद्धतीने परवानगी मिळवली असुन या सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी महत्वाच्या सुचना दिल्या..