जळगाव प्रतिनिधी । शहरातील खेडी रोड परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटला पोलीस पथकाने उद्ध्वस्त केले असून या कुंटणखान्याच्या मालकिणीसह ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन सुरू असतांना पिंप्राळा परिसरात सुरू असणारा एक हाय प्रोफाईल कुंटणखाना काही दिवसांपूर्वीच उद्ध्वस्त करण्यात आला होता. यानंतर याच प्रकारे खेडी रोडवर असणार्या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले व सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक बापू रोहोम, एमआयडीसीचे निरिक्षक विनायक लोकुरे व सपोनि निता कायटे यांनी एक पोलीस पथक बनविले. या पथकाने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सापळा रचून एका कर्मचार्याला ग्राहक म्हणून पाठविले. यानंतर त्याने इशारा करताच या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला.
गोपाळ प्रल्हाद पाटील यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून एका महिलेने तो भाड्याने घेऊन यात कुंटणखाना सुरू केला होता. यात महाविद्यालयीन तरूणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. पोलीसांनी या कुंटणखान्याची मालकीण व अन्य एक महिलेसह संजय सोमनाथ चव्हाण (रा. ऑटोनगर, जळगाव); पराग प्रकाश लोहार (रा. खेडी, जळगाव ) व मुरली देविदास चव्हाण ( रा. करंजी ता बोदवड) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील पराग लोहार हा या कुंटणखान्याच्या व्यवसायात सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. तर मुरली चव्हाण व अन्य एक महिला या दलालीचे काम करत होत्या.