खामगावात पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल

खामगाव- – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक पत्रकार गणेश रामेश्‍वर भेरडे यांना धमकी दिल्याप्रकरणी शिवा गायकवाड सह दोन अनोळखी इसमांविरूध्द शिवाजीनगर पोलिस स्टेशनला प्रेस ॲक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात पत्रकार गणेश भेरडे (रा. गोपाळनगर) यांनी 15 फेब्रुवारी 2022 रोजी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यामध्ये नमूद केले आहे की, गणेश भेरडे हे लोकशाही जळगाव या वृत्तपत्राचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. त्यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजीच्या अंकात वरली मटका यासह इतर अवैध धंद्याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे पोलिसांनी अवैध धंदेवाईकांविरूध्द कारवाया करणे सुरू केल्याने अवैध धंदेवाईकांचे पित्त खवळले व त्यांनी हस्तकांमार्फत धमक्या देणे सुरू केले आहे. 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजताचे सुमारास ते कामानिमित्त घरून शहरात येत असताना दंडेस्वामी मंदिरा समोर शिवा गायकवाड अधिक 2 अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवुन त्यांना थांबविले. यावेळी शिवा गायकवाड याने तू वरली मटक्याच्या बातम्या छापल्यामुळे आम्हाला पोलिसांचा त्रास होत आहे. माझ्याजवळ फोर व्हीलरचे लायसन आहे, कधीही गाडीने उडवून देऊ शकतो असे म्हटले व तिघेही तेथून निघून गेले. यापूर्वीही गणेश भेरडे यांना अवैध धंदेवाईकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या आहेत. असेही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी शिवा गायकवाड व अधिक 2 अनोळखी इसम यांच्या विरूध्द भादंवि कलम 341, 506. 34 सहकलम 3,4 प्रेस कौन्सिल ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ मनोज खुंटे करीत आहेत.

Protected Content