जळगाव प्रतिनिधी । खान्देशातील जीनींग व प्रेसींग असोसिएशनच्या सर्व समस्या दिल्ली दरबारी मांडून याचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली. ते असोसिएशनतर्फे आयोजित ऑनलाईन संवादात बोलत होते.
खान्देश पांढरे सोने पिकविणारा प्रदेश आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न शेतकर्यांनी घेतले. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने यंदा अधिकाधिक हमीभाव देवून शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून सेवा देणारे जिनिंग-प्रेसिंग चालक व मालक यांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या आज असोशीएशन आयोजित ऑनलाईन संवाद सभेत समजावून घेतल्या आहेत. असोसिएशनने आपल्यात एकजूट ठेवा.शेतकरी बांधवांना अत्युच्च सेवा द्या. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून त्या समस्या येत्या काळात दिल्ली दरबारी मांडणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज दिली. जळगाव, धुळे, नंदुरबार येथील जिनींग प्रेसिंग चालक मालक आयोजित ऑनलाईन संवाद सभेत ते बोलत होते.
या सभेला खान्देश जिनींग प्रेसींग असोशिएयन अध्यक्ष प्रदीप जैन ,संचालक विनय कोठारी, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक अविनाश काबरा, ज्ञानेश्वर भामरे, माजी सभापती लकी उर्फ लक्ष्मण पाटील, सिद्धार्थ जैन, अनिल सोमाणी, संजय काबरा, संदीप पाटील, प्रशांत संघवी यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
केंद्रिय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेषदादा पाटील पुढे म्हणाले की जिनिंग व प्रेसिंग चालक मालक यांना तेलंगणा आंध्र प्रदेश येथील दरापेक्षा महाराष्ट्रात कमी दर मिळतो. तसा मोबदला आपणास मिळावा यासह आपल्या अनेक मागण्या बाबत लवकरच दिल्ली दरबारी भूमिका मांडेल. तसेच येत्या काळात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी तसेच भारत कपास निगमचे चेअरमन यांची भेट घेऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहील.
खासदार पाटील पुढे म्हणाले की खान्देश जीनींग प्रेसिग असोशिएयन ही खान्देशची एकमेव रजिस्टर जिनिंग-प्रेसिंग असोसिएशन आहे. या माध्यमातून गेले वीस वर्षापासून ही असोशिएयशन जिनर्स आणि शेतकर्यांच्या फायद्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. वेळोवेळी बदल घडवून शेतकर्यांना जास्तीत जास्त कसा भाव मिळेल या बाबतीत नेहमीच आग्रही राहिलेली आहे. शेतकर्यांचा प्रती एकर उत्पन्न कसे वाढावे या विषयी नेहमी प्रयत्नशील आहे.शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहे.एवढेच नव्हे तर असोशिएशयन तर्फे ऑल इंडिया पातळीवर चार बैठका जळगाव येथे घेण्यात आलेल्या त्याचप्रमाणे असोशियनने आजवर चायना सिंगापूर व्हिएतनाम इंडोनेशिया आधी देशात जाऊन आपल्या कापसाला कसा भाव जास्त मिळेल व शेतकर्यांना अधिक फायदा मिळेल याविषयी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. हे भूषणावह असून आज या निमित्ताने मी असोशीएशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांचे स्वागत करतो. यावेळी मोठ्या संख्येने चालक मालक सहभागी झाले होते. असोशिएशन सदस्यांनी अनेक मागण्या यावेळी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या कडे मांडल्या.