जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा लगत असलेल्या खदानीत आज सकाळी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात बांधलेला मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. मयत तरुणी रविवार दुपारपासून बेपत्ता होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला अटक केल्याचे वृत्त आहे.
आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास काही तरुणांना एका मुलीचा ओढणीने हात बांधलेला मृतदेह तांबापुरा लगत असलेल्या खदानी दिसून आला. यानंतर पोलिसांनी मृदेहाची ओळख पटवली. मयत तरुणी आपल्या आईसोबत मागील तीन महिन्यापासून गणपती नगरमध्ये धुणी-भांडी धुण्याचे काम करत होती. रविवारी दुपारी नेहमी प्रमाणे आपल्या आईसोबत मयत तरुणी १२:३० वाजेच्या सुमारास घरातून निघाली. गणपती नगरमध्ये आजुबाजूच्या घरात दोन्ही माय-लेकी कामासाठी गेल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार थोड्याच वेळात तेथे एक मद्याच्या नशेत तरुण आला आणि घर मालकीण बाईला सलमा (नाव बदलेले) घरात आहे का?, अशी विचारपूस करू लागला. घरमालकीण बाईने तीन वेळेस त्या अज्ञात तरुणाला हटकले. परंतू चौथ्यांदा तो तरुण सलमा आपल्या सोबत घेऊन गेला. कुणी नातेवाईक असेल म्हणून घरमालकीण बाईने दुर्लक्ष केले. घरी जाण्याच्या वेळी सलमाच्या आई विचारपूस केली असता. कुणा सोबत तरी सलमा गाडीवर निघून गेल्याचे घरमालकीणबाईने सांगितले. घरी परतल्यावर सलमा कुठेही दिसून येत नव्हती. त्यामुळे रात्री सलमाच्या आईने अपहरणाची फिर्याद रामानंद नगर पोलीस स्थानकात दिली. त्यानंतर आज सकाळी सलमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत तरुणीच्या नातेवाईकांनी हा खून असून ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केल्याचे वृत्त कळते.