खरीपच्या हंगामात नियमांची पायमल्ली :५४ कृषी केंद्र चालकांना नोटीस

रावेर, प्रतिनिधी । बियाणे व खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाने तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी केली असता त्यात ५४ कृषी केंद्र चालकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केलेले  नसल्याचे दिसून आले आहे. अनियमितता असणाऱ्या या कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाने नोटीस बजावल्या आहेत.

खरीप हंगामाची शेतकऱ्यांकडून तयारी सुरु असून बी-बियाणे तसेच खते घेण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरु आहे. मात्र संधीचा फायदा घेऊन कृषी केंद्र चालकांकडून जादा दराने बियाणे व खते विक्री होण्याची शक्यता असते. यावर कडक निर्बंध कृषी विभागाने लावले आहेत. तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी एल ए पाटील यांच्या पथकाने तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात नियमांचे पालन व पूर्तता न करणाऱ्या ५४ कृषी केंद्र चालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. सात दिवसात लेखी खुलासा सादर न करणाऱ्या कृषी केंद्राचा अहवाल कारवाईसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात येणार आहे. कृषी अधिकारी एल. ए. पाटील यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की,  शेतकऱ्यांनी बियाणे व खते विकत घेतांना कृषी केंद्र चालकांकडून पक्के बिल घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या भावापेक्षा जादा दराने खते व बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांची तक्रार करावी. यासाठी पंचायत समितीत स्वतंत्र तक्रार कक्ष स्थापन केलेला आहे.

Protected Content