खडका सरपंचाचे पुत्र गिरीश तायडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या सरपंच यशोधरा तायडे यांचे पुत्र गिरीश तायडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

 

भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी व हॉटेल व्यवसायीक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष गिरीश तायडे ( वय ४५ ) हे आपले काम आटोपून घराकडे निघाले असता खडका एमआयडीसीमध्ये दोन मोटरसायकल वरील तरुणांनी समोर येऊन अचानकपणे गिरीश तायडे यांच्यावर चाकुने सपासप पाच ते सहा वार केले. हल्लेखोरांनी त्यांना जखमी करून तेथून पळ काढला. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

 

दरम्यान, जखमी गिरीश तायडे यांना भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्या मानेवर व खांद्यावर चाकूने वार करण्यात आले आहे. घटनास्थळी डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

खडका येथील सरपंच यशोधरा तायडे यांचा जखमी गिरीश तायडे हा मोठा मुलगा आहे. याच सरपंच निवडीवरून तसेच गेल्या १३ एप्रिल रोजी दोन तरुणांवर साकरी उड्डाण पुलाखाली झालेल्या गोळीबारात उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का ? याचा तपास तालुका पोलीस घेत आहेत.सदर घटनेने परिसरात एकच खळबळ ऊडाली असुन दवाखाण्यात रात्री मोठी गर्दी जमा झाली होती.पोलिसांनी शहरात व खडका येथे बंदोबस्तात वाढ केली आहे.

Protected Content