खंडणी उकळणारे तोतया अधिकारी अटकेत

मुंबई : वृत्तसंस्था । खोट्या गुन्ह्यात अटक करू, अशी धमकी देत शहरातील व्यावसायिकांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटास काळाचौकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे(एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून या आरोपींनी एका सराफाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपींनी मध्य मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाचे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भर रस्त्यात गाडी अडवून अपहरण केले. एका आरोपीने व्यावसायिकाला एनआयएचा उपायुक्त, अशी ओळख सांगितली. खातरजमेसाठी ओळखपत्रही दाखवले. तुमच्या विरोधात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यावरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला अटक केली जाईल, असे सांगत आरोपीने व्यावसायिकाला घाबरवले. कारवाई टाळायची असल्यास दोन कोटी रुपये द्यावे लागतील, असेही सुचवले. व्यावसायिकाने २५ लाख रुपयांवर तडजोड केली.

पैसे दिल्यानंतर व्यावसायिकाला फसवणूक झाल्याची जाणीव होऊ लागली. त्याने एनआयए कार्यालयात चौकशी केली तेव्हा त्याचा अंदाज खरा ठरला. आरोपींनी सांगितलेल्या नावांचा एकही अधिकारी यंत्रणेत कार्यरत नव्हता. मात्र बदनामी होईल या विचाराने त्याने पोलिसांत तक्रार देणे टाळले.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अन्य व्यावसायिकाकडून खंडणी उकळताना काळाचौकी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती या व्यावसायिकाला मिळाली. तेव्हा त्याने काळाचौकी पोलिसांना स्वत:वर बेतलेला प्रसंग सांगितला. अटकेत असलेल्या आरोपींनीच या व्यावसायिकाला फसवल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंदवला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना पुन्हा अटक केली.

राजेश पवार, विजय सिंग आणि इकबाल खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी एक आरोपी स्वत: व्यावसायिक आहे. मात्र तोटा झाल्याने त्याला व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर त्याने फसवणुकीचा धंदा सुरू केला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Protected Content