‘क्रेडाई’, ‘जेसीईए’ तर्फे बांधकाम कामगारांचे लसीकरण पूर्ण

जळगाव, प्रतिनिधी | आज जळगाव शहर कोरोना महामारीच्या संख्येबाबत शून्य आहे. हे शून्य कायम ठेवून शहर कोरोनामुक्त करायचे आहे. कामगार बांधवांनी नेहमी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संकट आले की, आपण एकत्र येऊन लढा देतो. त्याचा सामना करतो व संकट परतवतो हे कोरोनाच्या दोन्ही लाटेत पुन्हा एकदा दिसून आले आहे. हीच एकी कायम टिकवून ठेवायची आहे, असे आवाहनवजा प्रतिपादन शहराचे महापौर जयश्री महाजन यांनी केले.

 

बांधकाम क्षेत्रातील कामगार व परिवारातील सदस्यांकरता नानीबाई रुग्णालय व चेतनदास मेहता रुग्णालयात मोफत लसीकरण शिबिर १७ ऑक्टोबर रोजी ‘मिशन कोरोनामुक्त जळगाव’अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. त्याचे उदघाटन सकाळी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. हे शिबीर ‘क्रेडाई’च्या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी राज्यव्यापी लसीकरणाच्या मोहिमेअंतर्गत क्रेडाई जळगाव व जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्यामार्फत जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने घेण्यात आले.

यावेळी मंचावर क्रेडाई, महाराष्ट्रचे सहसचिव अनिष शाह, जळगांवचे अध्यक्ष हातीम अली, सचिव दीपक सराफ, जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष भरत अमळकर, असोसिएशनचे सचिव मिलिंद काळे व प्रकल्प प्रमुख तुषार तोतला उपस्थित होते.

प्रसंगी महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत कामगारांना लस देऊन लसीकरण सुरू करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत, प्रकल्प प्रमुख तुषार तोतला यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

यावेळी महापौर महाजन म्हणाले की, कोरोना महामारी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस घेणे महत्वाचे आहे. बांधकाम कामगार हा घटक अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. कोरोना महामारीच्या काळात बांधकाम कामगार बांधव अधिक भरडला गेला. मात्र ‘क्रेडाई’सारख्या सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना मदत झाली, असेही महापौर म्हणाल्या.

लसीकरण अंतर्गत नानीबाई अग्रवाल रुग्णालयात कोविशिल्ड तर चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सीन लस पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
दिवसभरात ३१० कामगारांनी कोविशील्डचा तर २२५ कामगारांनी कोव्हॅक्सीन लस घेऊन स्वतःला कोरोनाविरोधात सुरक्षित करून घेतले. सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी तर आभार तुषार तोतला यांनी मानले.

यावेळी रुग्णालयातील डॉ.सोनल कुलकर्णी, अधिपरिचरिका शोभा कोगदे, शिवानी परदेशी, कर्मचारी शीतल पाटील, कर्मचारी सुनंदा चौधरी, लक्ष्मीबाई हंसकर , कल्याणी वर्दे, जयश्री चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई संस्थेचे माजी अध्यक्ष निर्णय चौधरी, क्रेडाई वुमन्स विंगचे अध्यक्ष सुचिता चौधरी, श्रुती शहा, रुपाली चौधरी, निकिता खडके, ऍड. पुष्कर नेहेते, ललित भोळे, चंद्रकांत पाटील, प्रथमेश सैनी, चंदन कोल्हे, जितेंद्र लाल, जितेंद्र राठी, सचिन धांडे, निलेश पाटील आदी पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content