जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलासमोरून एका फोटोग्राफरची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दगडू मयाराम कोळी (वय-३५) रा. वराडी ता. चोपडा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार २७ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९ बीबी ४२८०) ने जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजवळ आले होते. त्यावेळी संकुलाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी दुचाकी पार्क करून लावली व कामानिमित्त निघून गेले. दुपारी २ वाजता काम आटोपून दगडू कोळी हे परत आले तेव्हा त्यांना जागेवर दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार ३० मार्च रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश गरबड करीत आहे.