जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रासाठी (कंटेन्मेंट झोन) स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नगरपालिका/नगरपरिषद कार्यक्षेत्रासाठी संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची तर ग्रामीण भाग कार्यक्षेत्रासाठी गटविकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागामध्ये एका तालुक्यात एकापेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या अधिनिस्त असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकाऱी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पशुधन अधिकारी, कृषि अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता इत्यादिंची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. तर नगरपालिका/नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी नोडल अधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्रासाठी प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र असा शाखा अभियंता, समकक्ष अधिकारी यांची झोनमध्ये वाहतूक आणि रसदसाठी नियुक्ती करावी.
संबंधित शाखा अभियंता यांनी आपल्या झोनमधील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छता, साफसफाई अशा अत्यावश्यक सेवा सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रामधील येण्याऱ्या व जाणाऱ्यांविषयी पोलीसांना वेळोवेळी कळवावे आणि नोडल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार अंमलबजावणी करणे. याचप्रकारे ग्रामीण भागासाठी नियुक्त गटविकास अधिकारी यांनीही कार्यवाही करावयाची आहे.
संबंधितांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास अथवा भंग केला गेल्यास सर्व संबंधित आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहतील. असे अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जळगाव तथा प्रसंग नियंत्रक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी आदेश निर्गमित केले आहे.