कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर !

जळगाव (प्रतिनिधी) सध्या कोव्हिड-19 या विषाणूमुळे पसरत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूने बाधित होऊन मृत्यू पावलेल्यस व्यक्तींच्या मृतदेहाची हाताळणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण 2020/प्र.क्र. 124/आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून जळगाव जिल्ह्यातील शासकीय, खाजगी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या व कोव्हिड -19 विषाणू संसर्गाने/आजाराने मृत्यू पावलेल्या (Positive किंवा Suspect) रुग्ण/व्यक्ती यांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचना निर्गमित केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीचा कोव्हिड-19 विषाणूने बाधित होऊन मृत्यू झाल्यास, तसेच कोव्हिड-19 संशयित रुग्ण/व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह कोणत्याही परिस्थितीत परस्पर रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता संबंधित रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण-2020/प्र.क्र.124/आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन करावी. जळगाव जिल्ह्यातील कोव्हिड-19 बाधित रुग्णावर उपचार करण्यात येत असलेल्या कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयात रुग्ण कोव्हिड Positive किंवा Suspect म्हणून दाखल झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यास व त्याच्या मृत्यूनंतर संबधित मयत व्यक्तीचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास किंवा रिपोर्ट प्रलंबित असल्यास देखील रुग्णालय प्रशासनाने मयत व्यक्तीचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात न देता संबंधित रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण-2020/प्र.क्र.124/आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन करावी.

नमूद केलेप्रमाणे कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयात मयत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यविधीचा खर्च संबधित रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात येत असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांचेकडेस उपलब्ध असलेल्या निधीतून करावा. महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण-2020/ प्र.क्र.124/ आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोव्हिड-19 पॉझिटीव्ह/ बाधित/संशयित मृतदेह हाताळण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content