भोपाळ : वृत्तसंस्था । ज्यूनियर महिला न्यायाधीशाबरोबर फ्लर्ट करणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी जिल्हा न्यायाधीशाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. न्यायव्यवस्थेत अशा प्रकारचं वर्तन अजिबात मान्य नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
“ज्यूनियर महिला न्यायाधीशाबरोबर वरिष्ठ न्यायाधीशाचं अशा प्रकारचं वर्तन अजिबात मान्य नाही” असं मुख्य न्यायमूर्ती एस.ए.बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. या प्रकारणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत, शिस्त विषयक केलेल्या कारवाई विरोधात निवृत्त न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली होती.
महिला न्यायधीशाने विषय संपवण्याचा निर्णय घेतलेला असताना, आता या प्रकरणात कुठली चौकशी होऊ नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणं आहे, तर माजी न्यायाधीशांच वर्तन हे पदाला शोभणारं नाहीय, त्यामुळे स्वत:हून या प्रकरणाची दखल घ्यावी लागली, असं न्यायालयानं आपल्या निर्णयाचा बचाव करताना सांगितलं.
सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्यावतीने युक्तीवाद करणारे वरिष्ठ वकिल रविंद्र श्रीवास्तव यांनी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि महिला न्यायाधीशामध्ये व्हॉट्सल अॅपवरुन झालेला संवादही वाचून दाखवला. महिला न्यायाधीशाला स्पर्श करण्याची तसेच पती-पत्नी सारखे संबंध ठेवण्याची इच्छा माजी जिल्हा न्यायाधीशाने मेसेज मधून बोलून दाखवली होती.
महिला न्यायाधीशाने या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ निवृत्त जिल्हा न्यायाधीशाविरोधात जबाबही नोंदवला होता. पण नंतर महिला न्यायाधीशाने चौकशीमधून माघार घेतली. आपण वाद मिटवल्याचे महिलेने सांगितले, श्रीवास्तव यांनी सुनावणी दरम्यान या मुद्याकडे लक्ष वेधले. या प्रकरणात पुरुष न्यायाधीश वरिष्ठ न्यायिक अधिकारी होता. त्यामुळे महिला न्यायाधीशावर नक्कीच काही तरी दबाव असणार, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असा दावा श्रीवास्तव यांनी केला.