कोरोना विषाणू इटलीमध्ये २०१९ च्या सप्टेंबरमध्ये आढळून आल्याचा दावा

 

रोम : वृत्तसंस्था । कोरोनाची उत्पत्ती चीनमधील वुहानमध्ये झाल्याचे सांगितले जात असले तरी हा विषाणू इटलीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मिलान शहरामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी हा दावा केला

कोरोनाचा फैलाव मागील वर्षी नोव्हेंबरआधीपासूनच सुरु झाल्याचेही सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच चीनमधील वुहानमधून कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाल्याचा दावा चुकीचा आहे का ?, यासंदर्भातील चर्चा आता सुरु झाल्या असून या संशोधनाचा अभ्यास आता जागतिक आरोग्य संघटनाही करणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हा श्वसनाशी संबंधित आजार असून याची साथ येण्याआधी फारशी माहिती उपलब्ध नव्हती असं म्हटलं आहे.. इटलीमधील संशोधकांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास डब्ल्यूएचओकडून केला जात असल्याचेही संस्थेने स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यामध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला असून यासंदर्भातील माहिती आम्ही मागवल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

इटलीमध्ये पहिला रुग्ण २१ फेब्रुवारी रोजी लोम्बार्डी प्रांतामधील मिलानजवळच्या छोट्या शहरामध्ये आढळला होता. तुमोरी जर्नलमध्ये इटालियन संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा अहवाल छापून आला आहे. या अभ्यासामध्ये ९५९ स्वयंसेवक सहभागी होते. या तरुणांच्या फुफुसांचे स्कॅनिंग करुन त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे की नाही हे तपासण्यात आलं. या चाचण्या सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान पार पडल्या. यापैकी ११.६ टक्के तरुणांच्या शरिरामध्ये इटलीत पहिला रुग्ण आढळण्याआधीच म्हणजेच फेब्रुवारीआधीच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या अ‍ॅण्टीबॉ़डीज निर्माण झाल्याचे आढळून आलं.

यानंतर सार्स कोव्ही-टू या विषाणूसाठीच्या अ‍ॅण्टीबॉडीजची चाचणी सिएना विद्यापिठामध्ये करण्यात आली. ‘मागील वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही स्वयंसेवकांच्या शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या. म्हणजेच या चार जणांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये करोनाचा संसर्ग झाला होता असं या अहवालाचे लेखक असणाऱ्या जिओव्हानी ओप्लोवन यांनी म्हटलं आहे. “या संशोधनाचा अर्थ असा होतो की मोठ्याप्रमाणात फैलाव होण्याआधी हा विषाणू अस्तित्वात होता. तो कमी घातक होता,” असं जिओव्हानी म्हणाले.

 

हा अहवाल सादर करणारे लेख, संशोधक यांच्याशी संपर्क करुन या अभ्यासासंदर्भातील सर्व माहिती घेतली जाणार असून संशोधनाची पद्धत, नमुने या सर्वांचाही पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. लोम्बार्डी प्रांतामध्ये अचानक मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात फ्लूचे रुग्ण आढळून आले होते. त्याचवेळी कोरोनाचा विषाणू यापूर्वीपासून अस्तित्वात असू शकतो असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला होता.

Protected Content