कोरोना विषाणु विरुद्धच्या लढाईचे लोकप्रतिनिधींनी नेतृत्व करावे – पालकमंत्री डॉ. शिंगणे

बुलडाणा, प्रतिनिधी । सर्व लोक प्रतिनिधींनी शासन व प्रशासनामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांदयाला खांदा लावून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू असलेल्या लढाईत केवळ सक्रिय सहभाग न नोंदविता या ऐतिहासिक लढयाचे नेतृत्व करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाले,  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. दिनांक २२ मार्च २०२० रोजी सकाळी ०७.०० वा. ते रात्री २१.०० वा. पर्यंत जिल्हातील सर्व नागरिकांनी ‘जनता कर्फ्यु ” मध्ये जिल्हयातील नागरिकांनी ज्या सकारात्मक पध्दतीने व उत्साहाने सहभाग घेतला. त्याबददल सर्व जिल्हा वासियांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. राज्याचे  मुख्यमंत्री यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कोरोना विषाण विरुध्दचे युध्द जिंकण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. काल दिनांक २२ मार्च २०२० पासून संपूर्ण राज्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

मातृतीर्थ बुलडाणा जिल्हयामध्येही जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा यांनी सदरचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमू नये इत्यादी निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, सदर प्रतिबंधात्मक आदेशाचे अनुपालन करण्यामध्ये बऱ्याच नागरिकांची उदासीनता व बेफिकीरी दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या महत्वाच्या बाबींकडे सर्व नागरिकांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक वर्तन ठेवणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नम्रपणे नमूद केले आहे.

आज २३ मार्च २०२० रोजी राज्याचे  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांनी वरिष्ठ अधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेवून यासंदर्भात आढावा घेतला आहे. आंतरराज्य सिमा तसेच आंतरजिल्हा सिमा सिल करणे, सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालणे, सर्व धार्मिक प्रार्थना स्थळे नागरिक / भाविकांसाठी बंद करणे, जीवनावश्यक
अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची यादी सर्व समावेशक करुन त्या बाबतची कार्यपध्दती निश्चित करणे इत्यादी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. राज्य शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेत संपूर्ण राज्यामध्ये दिनांक ३१ मार्च २०२० पावेतो लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे. कोरोना विषाणू विरुध्दचे युध्द जिंकण्यासाठी शासन व प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची अत्यंत महत्वाची भुमिका व जबाबदारी आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनी या संदर्भात अधिक सकारात्मक भुमिका निभावणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नमूद केले आहे.

   पालकमंत्री पुढे नमूद करतात, की जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने मी सर्व नगर परिषदांचे नगरसेवक, सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य व ग्राम पंचायत सरपंच यांना आवाहन करतो की, लोक प्रतिनिधीनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याबाबत जनजागृती व प्रबोधन करावे. सर्व लोक प्रतिनिधींनी जीवनावश्यक अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची दुकाने कोठे आवश्यक आहेत ? त्याबाबतची योग्य ठिकाणे कोणती ? कोणत्या वाहनांमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येणार आहे? याबाबतच्या नियोजनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पुणे, मुंबई व इतर ठिकाणी नोकरी व कामधंदयाकरीता जिल्हयातील अनेक नागरिक आपल्या मुळ गावी परत येत आहेत. अशा सर्व नागरिकांची कोरोना विषाणू संदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. बऱ्याच गावांमध्ये अशा नागरिकांना प्रवेश देण्याबद्दल स्थानिक लोक आक्षेप नोंदवित आहेत. यासाठी सर्व लोक प्रतिनिधींनी स्थानिक प्रशासना सोबत समन्वय साधून बाहेरून येणाऱ्या नागरिकाची वैद्यकीय तपासणी करण्याकडे लक्ष पुरवून ग्रामस्थांना आश्वस्थ करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

Protected Content