‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव प्रतिनिधी । ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून युध्द पातळीवर काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. ग्रामीण भागातील संशियत रुग्णांना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयातच भरती करून त्यांच्यावर आवश्यक तो प्रथमोपचार करावा. रुग्णास जिल्हास्तरापर्यंत आणण्याची आवश्यकता भासली, तर त्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या आहेत.

 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून त्यांच्या विभागातील ‘कोरोना’ विषाणू संदर्भातील माहिती जाणून घेतली. त्यानंतर आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, पोलीस उप अधिक्षक नीलभ रोहण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अघिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, महानगरपालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले, ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अत्याधुनिक सुविधा असलेल्या वॉर्डसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालये, जैन हिल्स अशा संस्थांच्या ठिकाणीही असे वॉर्ड उभारण्यात येतील.  नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शासकीय यंत्रणाबरोबरच तेथील नागरिकांनी सुध्दा प्रशासनास सहकार्य करून शक्यतो आपण शहराकडे जाणार नाहीत यावर ठाम असावे. नागरिकांनी गर्दी व प्रवास टाळावा.

पोलिस विभाग तसेच नगरपालिकांना ‘कोरोना’चा प्रसार

रोखण्याकरीता जनजागृतीसाठी आवश्यक वाहन व तत्सम सामग्री प्रशासनाकडून पुरविण्यात येईल. पोलिस, आरोग्य सेवेतील सर्व घटक, नगरपालिकांच्या सर्व यंत्रणांना मुख्यत्वे बाहेर किंवा जनता संपर्कातील कामे करावी लागत असल्याने त्यांना प्रशासनाकडून मास्क व आवश्यक ती काळजी घेण्यासाठी साहित्याचा पुरवठा करण्यात येईल. सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी आपापल्या कार्यालयात विनाकारण गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकरी डॉ. ढाकणे यांनी दिल्या.

हॉटेल चालकांना फक्त होम डिलेवरी देता येणार

जळगाव शहर किंवा जिल्ह्यातील अन्य शहरात नोकरी, उद्योग, व्यापार, शिक्षण आदी कारणांमुळे अनेक व्यक्ती आपल्या गावापासून तसेच कुटुंबापासून वास्तव्यात आहेत, अशा नागरिकांची जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी हॉटेल मालक/ चालकांना हॉटेल सूरू न ठेवता फक्त गरजू ग्राहकांसाठी घरपोहोच (होम डिलेवरी) सेवा सुरू ठेवावी. होम डिलेवरी सेवा सुरू ठेवताना हॉटेल चालकांनी सर्व्हिस काऊंटर सुरू राहणार नाही. याची विशेष दक्षता पाळणे आवश्यक आहे. हॉटेलात कोणीही ग्राहक प्रत्यक्ष जेवण करण्यासाठी किंवा जेवण घेवून जाण्यासाठी येता कामा नये. याचे उलंलघन झाल्यास हॉटेल चालक, मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.

Protected Content