बेंडाळे महिला महाविद्यालयात “जल्लोष २०१९” हे स्नेहसंमेलन

Bandale mahavidyalay news

जळगाव प्रतिनिधी । शिक्षणामुळे डोळसपणा येतो. वैज्ञानिक दृष्टीकोन मिळतो. वैचारिक भान येते. विद्यार्थीनिनी सामाजिक भान जोपासत आयुष्यात प्रेरणादायी कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले.

लेवा एज्युकेशन युनियनच्या डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या “जल्लोष २०१९” हे स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्याच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.एल.ए.पाटील होते. प्रसंगी मंचावर सचिव एन.एस.पाटील, संचालक किरण बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, उपप्राचार्या प्रा.रत्नप्रभा महाजन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.सुनिता पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. नितीन बावस्कर, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातून साक्षी शर्मा व वरिष्ठ महाविद्यालयातून माधुरी सुनिल पाटील हे उपस्थित होते. प्रस्तावनेत प्रा. बावस्कर यांनी विविध स्पर्धांचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांनी सांगितले की, महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम असून विद्यार्थिनींना डिजिटल शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थिनींना कौशल्यवान बनविण्यासाठी उपयुक्त असे कोर्सेस महाविद्यालयात आहेत.

यावेळी महाविद्यालयातील विद्यापीठ श्रेणीतून उत्तम कामगिरी करणाऱ्या, एनएसएस, क्रीडा क्षेत्रातील तसेच विविध स्पर्धांमध्ये तसेच १२ वीतील चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांनी केला. तसेच पीएचडी धारक, सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. डॉ. एल.ए.पाटील यांनी पुढे सांगितले की, समाजासाठी तरुणांनी रोल मॉडेल बनले पाहिजे. हा देश तरुणांचा असून देशहितासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी यांनी, विद्यार्थिनींनी समाजात स्वत:ची ओळख निर्माण करा त्यासाठी स्वत:ला ओळखा, कौशल्य मिळवा आणि आयुष्यात मोठे व्हा असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.सविता राणे, रंजना पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
पारितोषिक वितरणानंतर महाविद्यालयात सांकृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील १५ विद्यार्थीनिनी सामुहिक व एकल नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सुरुवातीला गणेश वंदना झाली. त्यानंतर राजस्थानी नृत्य, कोळी नृत्य, गुजराती, पंजाबी, महाराष्ट्रीयन तसेच देशभक्तीपर गीतांनी विद्यार्थीनिनी त्यांची कला सादर केली. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पारंपारिक पेहरावासह प्रांतीय आणि वेस्टर्न पेहराव केला होता. “आ रा रा रा, रंगीलो म्हारो ढोल”, “वेसावची पारू”, “ कोलीवाड्याची शान आई तुझे देऊळ”, “चला जेजुरीला जाऊ” अशी अनेक गीतांवर विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम गाजविला. याशिवाय १० विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात आणि मधुर भाषेत गीतगायन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी पाटील आणि साक्षी शर्मा या विद्यार्थिनींनी केले.

बेस्ट स्टूडंट माधुरी पाटील
डॉ.बेंडाळे महाविद्यालयाची या वर्षाची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून विज्ञान विद्याशाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी माधुरी सुनिल पाटील हिची निवड झाली. तिला मान्यवरांनी गौरविले. चेतना चंद्रकांत चौधरी (बीएतून प्रथम), अबोली दिनकर खैरनार (बीएस्सीतून प्रथम), ऐश्वर्या विलास चव्हाण (बीकॉममधून प्रथम) यांच्यासह इतर गुणवंतांचा सन्मान झाला.

स्नेहसंमेलनात विविध खेळांनी आणली रंगत
स्नेहसंमेलनात निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, हास्य, शेला पागोटे, आरशात न पाहता मेकअप, मेहंदी, रांगोळी, पोस्टर्स, संगीतमय फिशपोंड, अंताक्षरी, मूकनाट्य, नाट्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फूड फेस्टिवल मध्ये विद्यार्थिनींनी पारंपारिक आणि प्रांतीय खाद्यपदार्थ ठेवले होते. जिमखाना समितीच्या वतीने क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्नेहसंमेलनासाठी विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content