कोरोना : लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे भुसावळात आगमन

भुसावळ, प्रतिनिधी । दिल्लीहून महाराष्ट्रातील विद्यार्थीना घेऊन निघालेली विशेष रेल्वे आज दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वेने राज्यातील 1 हजार 345 विद्यार्थ्यांचे आगमन झाले. यापैकी 19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरले. यावेळी या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दोन महिन्यांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या राज्यात आल्याचा आनंद व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणा दिल्यात.

दिल्लीत लॉक डाउनमध्ये अडकलेल्या यूपीएससीच्या १३३८ विद्यार्थ्यांना घेऊन येणारी रेल्वे आज १७ मे रोज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहचली. यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या ५३८ विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. यानंतर प्रवाशांसाठी एस.टी बस आगरांच्या २५ बसेस सोडण्यात आलेल्या आहे. या बसेस मधून विद्यार्थ्यांना आप-आपल्या गावी सोडण्यात आले.

दिल्लीहून या रेल्वेने राज्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकोला-24, अमरावती-20, वर्धा-14, गडचिरोली-8, चंद्रपूर-17, यवतमाळ-17, धुळे-14, नंदूरबार-9, जळगाव-29, औरंगाबाद-31, जालना-13, परभणी-25, नागपूर-33, भंडारा-11, गोंदिया-8, बुलढाणा-30, वाशिम-19, हिंगोली-15, नांदेड-32 याप्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी नाशिक, कल्याण, पुणे येथील पुढील प्रवास करणाऱ्यांसाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याप्रसंगी रेल्वे स्थानकावर आरपीएफ कमांडन्ट क्षितीज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, आरपीएफ निरीक्षक दयानंद यादव, सहाय्यक निरीक्षक कौल, आरपीएफ योगेश घुले, दीपक शिरसाठ, आर. के. यादव, ललित टोके आदी उपस्थित होते.

Protected Content