कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये कुचराई: भुसावळच्या मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये कुचराई केल्या प्रकरणी भुसावळ येथील मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांच्या जागी जळगाव येथील विशेष भूसंपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे.

भुसावळ शहरात कोरोनाचा हाहाकार उडाला असून येथील संसर्ग रोखण्यात प्रशासकीय यंत्रणांना अपयश आले आहे. यातच दिनांक २८ मे रोजी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक जाली. यात मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना शहरातील रूग्णांची संख्या, मयत रूग्ण व बरे झालेले रूग्ण आदींची अचूक माहिती देता आली नाही. तसेच प्रशासकीय कामांमध्ये कुचराई आढळून आल्याने शहरात कोरोना विरूध्द उपाययोजना करण्यात अपयश आल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुढील सूचना येईपर्यंत मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. या संबंधीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, करूणा डहाळे यांच्या जागी जळगाव येथील विशेष भूसंपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांना भुसावळचे मुख्याधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. त्यांनी आजपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

Protected Content