कुर्‍हा येथील एटीएममधून अंदाजे साडेनऊ लाखांची रोकड लंपास ( व्हिडीओ )

bank atm kurhe

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील बसस्टँड परिसरात असणारे आयडीबीआय बँकेचे एटीएम रात्री चोरट्यांनी फोडून अंदाजे साडेनऊ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील बसस्टँड परिसरात असणारे आयडीबीआय बँकेचे एटीएम रात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे कुर्‍हे पानाचे येथील बसस्थानक परिसरात असणार्‍या व्यापारी संकुलात आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे हे एटीएम फोडल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातून रक्कम लंपास करण्यात आली असून याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ही चोरी नेमकी कशी झाली याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी एटीएमच्या आतील भागात गॅसचे सिलेंडर व कटर आढळून आले आहे. यामुळे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रात्री अडीच ते पहाटे सहाच्या दरम्यान ही चोरी घडल्याची शक्यता आहे.

या एटीएम मध्ये नऊ लाख ४७ हजार रुपये असल्याचे समजते. तथापि, पोलीस प्रशासनातर्फे अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. चोरट्यांनी दोन गॅस हंड्या व गॅस कटर जागेवर सोडून पळ काढला असल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळचे प्रभारी तर फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख यांच्यासह तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठचे देवीदास पवार व शहरचे बाळासाहेब ठुबे यांच्यासह पनिरीक्षक गजानन करेवाड व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चोर्‍या वाढत असल्या तरी याचा तपास लागत नसल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

पहा : कुर्‍हा येथील एटीएम चोरीबाबतचा हा व्हिडीओ.

Protected Content