जळगाव प्रतिनिधी । कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांनी आपल्या आवडत्या कलांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तर महिलावर्गांनी रेसिपी बरोबरच इतर सुप्तगुणांना वाव दिला. अनेक हौशी व शिक्षकांनी नृत्य करत रोज आनंद लुटण्याचा प्रयत्न केलाय, अर्थात याचे पालक, नातेवाईक व चाहत्यांनी कौतुकही केले आहे.
प्रत्येकाकडे काहीना काही सुप्त गुण असतात.त्यातल्या त्यात संगीत व नृत्य हे काही औरच. एक वेगळीच अनुभूती व मनोरंजन याद्वारे होत असते.संगीत मनुष्याला नाचायला, थिरकायला भाग पाडते. संगीत हे आनंदाभूती देणारे उत्तम माध्यम आहे. ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येतं.. तर नृत्य ही नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. ६४ कलांपैकी असलेली एक कला म्हणजे नृत्य.. ! दृश्य, श्राव्य अशा दोन्ही अंगाची लय साधणारी नृत्य ही एकमेव कला होय. मग नृत्य हे पाश्चात्य असो की शास्त्रीय.. ! विविध भाव नृत्यात प्रकट होतच असतात.
जळगावातील अनेक नृत्यप्रेमींनी लॉकडाऊनच्या काळात सुवर्णसंधी साधली.कोणी गच्चीवर, कोणी घरातील हॉल, कोणी चक्क जिन्यात तर कोणी घराच्या अंगणात नृत्याचा जबरदस्त सराव केला.. आणि तो यशदायी ठरला.काही नृत्याशिक्षकांनी अनेक गाण्यावर नृत्य कंपोज केले आणि वेळ घालवत मनस्वी आनंद लुटला..काही पालकांनी स्वतः, तर काहींनी आपल्या पाल्यांना नृत्याचे धडे गिरवले.. तसं जळगांवला सांस्कृतिक आणि सुवर्णनगरी म्हटलेच जाते. या वैभवशाली शहराने अनेक प्रतिभावंत दिले आहेत असा इतिहास साक्ष आहे. जळगावातील एक नृत्यप्रेमी मनीष सातपुते यांनी जवळजवळ दररोज एक नृत्य करून शरीर स्वास्थ चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला.विविध प्रकारचे नृत्य करून स्वतः आनंद लुटला, असे त्यांनी सांगितले. राजेंद्र फिरके यांची कन्या अनघा हिने पुण्यात आय.टी.चे शिक्षण घेतलंय. ती अकोला येथे घरी आली आहे.वेळेचा सदुपयोग करत तिने तिच्या या कलेला न्याय दिलाय. तर डॉ.विजय पाटील यांचा चिरंजीव मिहीर याने चक्क ‘कोरोना’वर रॅप सॉंग तयार करून, सादर करून जनजागृती करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आणि विविध नृत्यही तो शिकला.त्यास आई सौ.प्राजक्ता यांनी खूप प्रोत्साहन दिले.
पारोळा येथे वनविभागात कार्यरत असलेले चंद्रशेखर विसपुते या कलंदर कलाप्रेमीने तर अनेक देखणे नृत्य करून मित्रांमध्ये धमाल केलीय..रोज मी एकदा तरी नृत्य करतो, त्याशिवाय करमतच नाही असे ते म्हणाले.नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या मयुरी सुभाष पवार हिने तिची मैत्रीण मृण्मयी वलकर हिच्यासोबत अप्रतिम नृत्य करीत मनसोक्त एन्जॉय केला.सध्या कॉलेज बंद, कुठलेच काम नाही, रिलॅक्स असताना नृत्यातले बारकावे, हावभाव शिकण्यासाठी भरपूर वेळ मिळाला व खूप समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर पायल संगीत नृत्यालयाचे सर्वेसर्वा संजय पवार यांनी सातत्याने सराव सुरूच ठेऊन ऑनलाईन क्लास घेतले. चांगलाच वेळ मिळाल्याने अनेकांनी आपल्या आवडत्या कलेला न्याय देत बरेच काही शिकायला मिळालं अशा भावना व्यक्त केल्या. आम्ही कोरोना विषाणू कायम स्मरणात ठेऊ असेही सांगितले.