कोरोना लस घेतलेल्या लाभार्थ्याच्या बोटावर शाई

 

जालना : वृत्तसंस्था । कोरोना लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्याच्या बोटावर शाई लावणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आज राज्यभरात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला असून लसीकरणासाठी आता राज्य सज्ज आहे, असं टोपे म्हणाले.

राज्यात फ्रंट लाईनच्या आठ लाख लोकांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल आणि हा कालावधी पूर्ण करण्यासाठी जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर लसीकरणानंतर लाभार्थ्याची ओळख पटावी म्हणून त्याच्या बोटाला शाई लावणार असल्याचं टोपे यांनी सांगितलंय.

लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे, असं सांगत तीन महिन्यात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल तसंच केंद्र सरकार दोन लसींपैकी एकाच कंपनीची लस राज्याला देणार आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

केंद्र सरकारकडे कोरोना लसीचा खर्च करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच एका राज्यात लसीकरण करण्यासाठी एका लसीलाच मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

केंद्र सरकारनं सीरम इनस्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवक्सिनच्या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, एखाद्या राज्यात दोन लसींना लसीकरणासाठी मंजुरी दिल्यास त्याचे रेकॉर्ड ठेवणे अडचणीचे जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी एका राज्यात एका लसीला परवानगी दिल्यास रेकॉर्ड ठेवणं सोपं जाईल, गोंधळ निर्माण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

भारत सरकारन दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं लस आणि लसीकरणाचा खर्च करण्यासाठी खर्च करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली. गरिबांना लस देण्यासाठी केंद्रानं खर्च उचलणं गरजेचे आहे. कोरोना लसीचा साठा, लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा खर्च आणि लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारनं द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याचं राजेश टोपेंनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात २ जानेवारील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते.

Protected Content