जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोविड रूग्णालयाने ६२ संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी भुसावळातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून उर्वरित सर्व निगेटिव्ह आले आहे. भुसावळात कोरोनाबाधितांचा आकडा ११ वर पोहचला आहे.
कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या ६२ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी ५९ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल तपासण्याची कार्यवाही सुरु आहे तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही भुसावळ येथील 58 वर्षीय महिला आहे. तर निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सम्राट कॉलनी, जळगाव येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील पंधरा व्यक्तींचा तर अडावद, ता. चोपडा येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील २५ व्यक्तींचा आणि भडगाव येथील मृत झालेल्या महिलेच्या तपासणी अहवालाचाही समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 58 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.