कोरोना : पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या सेवा घेता येणार

जळगाव (प्रतिनिधी) नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील बेडसाईड असिस्टंट-90, नर्सिंग आईज-427, तर फार्मसी असिस्टंट-67 असे एकूण प्रशिक्षित 584 उमेदवारांची सेवा घेता येणार आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागांमार्फत कौशल्य विकास संबंधित सर्व योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी या राज्यस्तरीय नोडल एजन्सी मार्फत राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास योजनेमधुन विविध अल्प मुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांध्ये राज्यातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगारक्षम बनविणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत Medical & Nursing आणि Helth Care Sector मध्ये Bedside Assistant, Nursing Aies, General Duty Assistant, Laboatory Assistant तसेच Pharmacy Assistant या अभ्यासक्रमांमध्ये आजतागायत जळगाव जिल्ह्यातील 584 युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात आलेले आहे.

सद्यस्थितीतील देशभरातील नोव्हेल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेवरील ताण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेवून केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 584 पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींच्या सेवा अत्यंत उपयोगी ठरणार आहेत.

नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून ज्या विविध उपाययोजना अंमलात आणल्या गेल्यात. त्याचाच एक भाग म्हणून पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील 584 उमेदवारांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे दीपेंद्र सिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांनी एका शासकीय पत्रकान्व्ये कळविले आहे.

Protected Content