कोरोना : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नावे नोंदवहीत नोंदवा – प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

रावेर प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात संचारबंदीचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने संबंधित गावाच्या सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची नावे एका नोंदवहित ठेवून तसा अहवाल पाठवावा असे आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आज काढले.

दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरीकांनी घराबाहेर निघु नये, गर्दी करू नये याबाबत वारंवार गावागावात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत सूचना देण्यात येत आहे. यासह मीडिया, क्षेत्रीय अधिकारी हे कोरोना विषयी जनजागृती करत आहे. यासदर्भात ग्रामस्तरीय करोना जनजागृती समिती स्थापन करण्यात आली असून सरपंच हे समितीचे अध्यक्ष तर पोलीस पाटील हे सचिव आहेत. मात्र शासनाचे कडक आदेश असतांना अनेक नागरीक, तरूण मुले हे हेतूपुरस्सर संचारबंदीचे उल्लंघन करून घोळक्याने फिरणे, गर्दी करणे असे प्रकार घडत आहे. यावर तत्काळ आळा बसावा यासाठी रावेर व यावल तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांनी गावात अशा लोकांची नावे नोंदवहीत नोंदवून दैनंदिन अहवाल संबंधित गावाच्या ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांच्या सहिनिशी मेलवर सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावे, अशा व्यक्तींवर कारवाई करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आज काढले आहे.

Protected Content