कोरोना ; चौकशी समितीसाठीची नावे मान्यतेसाठी चीनकडे !

जिनेव्हा: वृत्तसंस्था । कोरोना निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने समिती नेमली मात्र, समितीतील नावे मंजुरीसाठी चीनला पाठवण्यात आली यामुळे जागतिक आरोग्य संघटना पुन्हा वादात अडकणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेत निर्णय घेणाऱ्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने मे महिन्यात वार्षिक परिषदेत विषाणू निर्मिती चौकशीचा प्रस्ताव मंजूर केला होता. चीननेदेखील प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. नंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन सदस्यीय समितीने ऑगस्ट महिन्यात चीनचा दौरा केला या दौऱ्याबाबत कोविड-१९ च्या स्रोताची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. माइक रेयान यांनी कार्यकारी बैठकीत चौकशी समितीत जगातील अनेक तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली. या चौकशी समितीत कोणते तज्ज्ञ असावेत आणि त्यांनी चीनमध्ये कधी यावे याबाबतचा निर्णय चीन सरकारला घ्यायचा असल्याचे म्हटले.

समितीच्या तज्ज्ञांची यादी चीनला कधी दिली, याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर काही महिन्यातच हा आजार जगभरात फैलावला.

संसर्गाला चीन जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने केला आहे. चीनने माहिती लपवून ठेवली आणि त्यामुळे आजार जगभरात फैलावला असल्याचा दावा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेचा निषेध करत अमेरिकेने सदस्यत्वही सोडले.

Protected Content