कोरोना काळात आरोग्य टिकविण्यासाठी सायकलिंग उपयुक्त- पालकमंत्री

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात सुदृढ व चांगले आरोग्य टिकविण्यासाठी प्रत्येकाने सायकलिंग करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा नियोजन भवनात धुळे येथील बीआरएम सायकलिंग स्पर्धेत विजेत्या सायकलिंगपटूंच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यकमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्रमुख पाहुणे बेटावद येथील डॉ. प्रशांतचंद्र पाटील आणि शिरपूर येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.जे.बी. पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रारंभी पालकमंत्री ना. पाटील यांचा जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्याहस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहे, याच्यातून शारिरीक व मानसिक तणाव कमी होतो. जसा वेळ मिळतो तसा पायी किंवा सायकलिंग करत रहावे. कोरोना काळात योगा आणि सायकलिंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही. तब्येतीची मैत्री टिकविण्यासाठी व्यायाम करणे गरजेचा आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, जळगाव शहरातील रस्ते खराब असल्यामुळे भविष्यात अशा खेळाडूंना शहरातील एक स्वतंत्र ट्रॅक करून देण्याचे नियोजन करणार आहोत, धुळ्या प्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अश्या स्पर्धा घ्याव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे काही मदत करता येईल ते प्रयत्न आपण करणार असल्याचे ते म्हणाले. तर, शहरातील सायकलिंग करण्यासाठी शहरातील क्रीडा संकुलात जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे पालकमंत्री ना. पाटील यांनी सांगितले.

यांचा झाला सत्कार

या कार्यक्रमात टोनी पंजाबी, रविंद्र पाटील, अरूण महाजन, गणसिंग पाटील, पंकज कुळकर्णी, विलास पाटील, विद्याधर इंगळे, डॉ. निलेश भिरूड, सुनिल चौधरी, दिपक दलाल, विजय घोलप, रूपेश महाजन, अजय पाटील, संभाजी पाटील, किशोर पवार, शँकी सराफ, महेश सोनी, दिलिप तायडे, अनुप तेजवानी, निलेश वाघ, हितेंद्र राठोड, विशाल आंधळे, टिम मॅनेजर स्वप्निल मराठे, डॉ. सुभाष पवार, निशी माधवानी आणि सुझान शेख यांचा सत्कार करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बेटावद येथील डॉ. प्रशांतचंद्र पाटील आणि शिरपूर येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.जे.बी. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री ना. पाटील यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील तर सुत्रसंचालन व आभार सुभाष पवार यांनी मानले.

Protected Content