मुंबई वृत्तसंस्था । करोना विषाणू आणि संबंधित घटकांमुळे शेअर बाजारात होणाऱ्या घसरणीमुळे देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २८ टक्के घट झाली आहे. ३१ मार्चला अंबानी यांच्या संपत्तीचे मूल्य ४८ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.
जागतीक अहवालानुसार, जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी ८व्या क्रमांकावर आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्यांच्या संपत्तीत १९ अब्ज डॉलरची घट झाल्याचे दिसून आले. या यादीमध्ये समाविष्ट अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत ६ अब्ज डॉलरची अर्थात ३७ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख शिव नाडर यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची अर्थात २६ टक्क्यांची घसरण झाली आहे.
कोटक बँकेच्या उदय कोटक यांच्या संपत्तीत चार अब्ज डॉलरची (२८ टक्के) घट नोंदविण्यात आली आहे. अंबानी वगळता अन्य तीन मंडळी टॉप १००च्या यादीतून बाहेर पडली आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात २५ टक्के घट झाली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपत्तीत सर्वाधिक घट झालेले अंबानी हे दुसरे श्रीमंत ठरले आहेत. फ्रान्सस्थित फॅशन कंपनी एलव्हीएमएचचे सर्वेसर्वा बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीतही २८ टक्क्यांची घट होऊन ती ७७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.